
बारामती : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदासाठी दि. ८ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. युवा नेते पार्थ पवार यांची या जागेवर वर्णी लागेल अशी गेले काही दिवस चर्चा आहे. अशातच बारामतीतूनही काहीजण इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेवर कोणाची वर्णी लागणार याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे.
आपल्या कार्यबाहुल्यामुळे अजितदादांनी पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांच्या जागी युवा नेते पार्थ पवार यांच्या नावाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. दरम्यानच्या काळात अजितदादांनीही या रिक्त झालेल्या जागेवर बारामतीतील व्यक्तीच देणार असल्याचं जाहीर केलं होतं. या रिक्त जागेसाठी आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून दि. ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता संचालक मंडळाच्या सभेत ही निवड जाहीर होणार आहे.
जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. बारामती तालुक्यातील अ वर्ग सोसायटी मतदारसंघासाठी ही निवडणूक होणार आहे. या रिक्त जागेसाठी दि. ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते ११.३० या वेळेत अर्ज वाटप आणि स्वीकारले जाणार आहेत. ११.३० ते १२ या वेळेत अर्जांची छाननी होईल. १२.१५ वाजता वैध अर्जांची यादी जाहीर केली जाणार असून १२.३० अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल. त्यानंतर दुपारी १२.३० ते १ या वेळेत मतदान प्रक्रिया होणार असून १ ते १.३० या वेळेत मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे.
पुणे जिल्हा बँकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एकहाती वर्चस्व आहे. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात याच बँकेतून केली आहे. त्यामुळे आता जिल्हा बँकेच्या संचालकपदी कुणाला संधी मिळणार याचीच उत्सुकता निर्माण झाली आहे.