आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणे

PUNE CRIME: तिला मोबाईल हवा होता, आई-वडिलांनी नकार दिला; दहावीत शिकणाऱ्या मुलीनं थेट सातव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं जीवन..!

पुणे
ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

अलीकडील काळात मोबाईलचं फॅड वाढत असून त्यात लहान मुलेही मागे नाहीत. त्यामुळंच मोबाईलसाठी लहान मुलंही हट्ट धरताना दिसतात.. त्यातून चुकीचं पाऊल उचलल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना देहूत घडली आहे. मोबाईल दिला नाही म्हणून दहावीत शिकणाऱ्या मुलीनं सातव्या मजल्यावरून उडी मारत आपलं जीवन संपवल्याची घटना बुधवारी रात्री घडली आहे.

आर्या गणेश सावंत (रा. अभिलाषा हाऊसिंग सोसायटी, देहू) असे या मुलीचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, आर्या ही दहावीत शिकत होती. तिचे वडील गणेश सावंत आणि आई दोघेही सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. मूळचे सांगोला येथील सावंत कुटुंबीय कामानिमित्त देहूत वास्तव्यास आहेत. बुधवारी रात्री जेवण झाल्यानंतर आर्याने आपल्या आईला मोबाईल मागितला. परंतु त्यावेळी आईसह वडिलांनी मोबाईल न वापरता अभ्यासात लक्ष द्यावं असं सांगत मोबाईल देण्यास नकार दिला.

मोबाईल मिळत नसल्याने नाराज झालेल्या आर्याने कोणताही मागचा-पुढचा विचार न करता थेट सातव्या मजल्यावरून उडी मारली. त्यामध्ये ती गंभीररित्या जखमी झाली होती. या घटनेनंतर तिला तात्काळ जवळच असलेल्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर आर्याचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला.

दरम्यान, या घटनेनंतर देहू परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. केवळ एका मोबाईलसाठी आर्याने टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवनच संपवलं. ही धक्कादायक घटना असून मोबाईलचं वेड जीवघेणं ठरल्याचं या निमित्तानं समोर आलं आहे.


ह्याचा प्रसार करा
पुणे
Back to top button
Contact Us