जुन्नर : प्रतिनिधी
जुन्नर तालुक्यातील आळे गावातील तितरमळा येथे तीन दिवसांपूर्वी आजोबांसोबत खेळताना बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका चार वर्षांच्या चिमूकल्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मानसिक धक्का बसलेल्या या चिमूरड्याच्या आईनेही आज पहाटे विषारी औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या महिलेवर सध्या आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शिवांश अमोल भुजबळ (वय : ४ वर्षे) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. तर त्याची आई शिल्पा अमोल भुजबळ यांनी आज पहाटे आत्महत्येचा प्रयत्न केला. भुजबळ कुटुंबीय आळे गावातील तितरमळा येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरासमोरच उसाची शेतीही आहे. अमोल भुजबळ यांचा मुलगा शिवांश हा अंगणात आपल्या आजोबांसोबत खेळत होता. त्यावेळी अचानकपणे उसाच्या शेतातून आलेल्या बिबट्याने शिवांशवर हल्ला केला होता. या बिबट्याने अक्षरश: चिमूरड्याला उसाच्या शेतात फरफटून नेलं. या हल्ल्यात हा चिमुरडा गंभीर जखमी झाला होता. त्याला आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान या चिमूरड्याचा मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर भुजबळ कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला आहे. अशातच शिवांशच्या अचानक जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबीय दु:खात आहे. अशातच आज पहाटे शिवांशची आई शिल्पा यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच त्यांना तात्काळ आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, मला शिवांशकडे जायचं आहे.. त्याला शाळेतून घेऊन यायचं आहे अशी आर्जव ही माता करतेय. आपल्या चिमूरड्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे शिल्पा यांची मानसिक स्थिती ढासळली आहे. त्यातूनच त्यांनी आज आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे.