मुंबई : प्रतिनिधी
राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रीपद सोपविण्यात आले आहे. अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या पुण्याचे पालकमंत्रीपद भाजपच्या चंद्रकांत पाटील यांच्याकडे होते. मात्र नव्यानेच जाहीर झालेल्या यादीमध्ये पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आलेली आहे. यामुळे अजित पवार पुन्हा एकदा पुण्याचे कारभारी ठरले आहेत.
सुधारित यादीनुसार राज्यातील ११ जिल्ह्यांचे नवे पालकमंत्री जाहीर करण्यात आलेले आहेत. या नवीन राजकीय बदलांमुळे राजकीय वर्तुळात काय पडसाद उमटतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, अजित पवार यांना पुण्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. त्याचवेळी चंद्रकांत पाटील यांच्याकडे अमरावती आणि सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच राधाकृष्ण विखेपाटील यांच्याकडे अकोल्याचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे.
राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी खालीलप्रमाणे
पुणे- अजित पवार
अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
सोलापूर, अमरावती – चंद्रकांत पाटील
भंडारा- विजयकुमार गावित
बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर- हसन मुश्रीफ
गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
बीड- धनंजय मुंडे
परभणी- संजय बनसोडे
नंदूरबार- अनिल भा. पाटील
वर्धा – सुधीर मुनगंटीवार