
मुंबई : प्रतिनिधी
मागील अनेक दिवसांपासून राज्यातील ग्रामपंचायत निवडणूका विविध कारणास्तव प्रलंबित होत्या. मात्र लवकरच या निवडणुका होणार असून याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यभरातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका जाहीर झाल्या आहेत. ५ नोव्हेंबर रोजी या ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे.
राज्यातील एकूण २ हजार ३५९ ग्रामपंचायतींची निवडणूक ५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामध्ये २ हजार ९५० सदस्यपदाच्या आणि १३० सरपंचांच्या रिक्तपदांसाठी पोटनिवडणुकांचा समावेश आहे. येत्या ५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.
१६ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. २० ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगतदार ठरणार आहे.
असा असेल निवडणूक कार्यक्रम
१६ ते २० ऑक्टोबर – नामनिर्देश पत्र दाखल करणे
२३ ऑक्टोबर – नामनिर्देश पत्रांची छाननी
२५ ऑक्टोबर – दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देश पत्र मागे घेण्यासाठी मुदत
२५ ऑक्टोबर – निवडणूक चिन्हांचे वाटप
५ नोव्हेंबर – सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० वेळेत मतदान
६ नोव्हेंबर – मतमोजणी