आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणे

BIG NEWS : पाच दिवसांचं दवाखान्याचं बिल साडेपाच लाख; पैशांअभावी मृतदेहही मिळेना, त्यांनी थेट साधला अजितदादांच्या कार्यालयाशी संपर्क आणि मग घडलं असं..!

पुणे
ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत पावलेल्या वृद्धाचा मृतदेह पैशांअभावी अडवण्यात आला. पैशांच्या जमवाजमवीचे अनेक प्रयत्न करूनही यश आले नाही. शेवटी संबंधित कुटुंबाने थेट अजितदादांच्या कार्यालयाशी संपर्क साधला. त्यानंतर अजितदादांचे विशेष कार्य अधिकारी सुनील मुसळे यांनी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधत संबंधित कुटुंबीयांना बिलाच्या रक्कमेतून सूट मिळवून दिली. तेव्हा कुठे संबंधित कुटुंबीयांना हायसं वाटलं.

पुण्यात वास्तव्यास असणाऱ्या किरण क्षीरसागर यांचे वडील सुरेश क्षीरसागर यांना दि. ९ सप्टेंबर रोजी पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान दि. १४ सप्टेंबर रोजी त्यांचं निधन झालं. त्यानंतर हॉस्पिटल प्रशासनानं त्यांना ५ लाख ४१ हजार रुपये बिल भरण्यास सांगितलं. यात विम्याचे २ लाख १० हजार आणि रोख २० हजार असे २ लाख ३० हजार जमा झाले. परंतु ३ लाख ११ हजार रुपये बिल भरण्यासाठी पैसे कुठून आणायचे असा प्रश्न क्षीरसागर कुटुंबियांसमोर पडला.

बिल भरल्याशिवाय मृतदेह दिला जाणार नाही अशी भूमिका हॉस्पिटलकडून घेण्यात आली. त्यामुळे मुलगा किरण यांच्यासह जावई गणेश पिराळे यांनी विविध ठिकाणी संपर्क साधायला सुरुवात केली. या दरम्यान, गणेश पिराळे यांच्या सांगलीतील मित्रांनी अजितदादांचे विशेष कार्य अधिकारी सुनील मुसळे यांच्याशी संपर्क साधत हॉस्पिटलकडून होत असलेल्या अडवणुकीबद्दल माहिती दिली. सुनील मुसळे यांनी तात्काळ सह धर्मादाय आयुक्त मा. सुधीरकुमार बुक्के यांच्याशी संपर्क साधला. मा. बुक्के यांनी हॉस्पिटल व्यवस्थापनाला बिल माफ करण्यासंबंधी सूचना करत मृतदेह संबंधित कुटुंबियांच्या ताब्यात देण्यास सांगितलं.

अजितदादांचं कार्यालय आणि धर्मादाय आयुक्तालयाकडून संपर्क झाल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत संपूर्ण बिल माफ केलं आणि मृतदेह संबंधित कुटुंबियांच्या ताब्यात देण्याची तयारी दर्शवली. काल सुरेश क्षीरसागर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अडचणीच्या काळात अजितदादांच्या कार्यालयाची मदत क्षीरसागर कुटुंबियांसाठी लाख मोलाची ठरली. त्याचवेळी कोणतीही अडचण आल्यानंतर स्वत: अजितदादा किंवा त्यांच्या कार्यालयाकडून तात्काळ मदत उपलब्ध करून दिली जाते याचीही प्रचिती या निमित्तानं आली.


ह्याचा प्रसार करा
पुणे
Back to top button
Contact Us