दौंड : प्रतिनिधी
पत्नी आणि सासरच्या छळाला कंटाळून दौंड तालुक्यातील बोरिपार्धी येथील एका तरुणाने आत्महत्या केली आहे. प्रशांत संपत शेळके (वय २५ वर्षे, रा. केडगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी, सासू, सासरे आणि त्यांच्या जावयाविरोधात यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी संपत शेळके यांनी पोलीस यवत ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार मृत प्रशांत यांची पत्नी भाग्यश्री प्रशांत शेळके, सासू स्वाती दत्तात्रय पिसे, सासरे दत्तात्रेय विठ्ठल पिसे (सर्व रा. महर्षीनगर, ता. माळशिरस) आणि पिसे यांचे जावई प्रदीप भिवा नेवसे ( रा. बोरीपार्धी) यांच्या विरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडगाव येथील एका कंपनीत काम करत असताना प्रशांत आणि भाग्यश्री यांचा प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर पत्नी माहेरी गेल्यानंतर माघारी येताना दोन वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन आली. पत्नीने पहिले लग्न लपविल्याने प्रशांत आणि भाग्यश्री यांच्यात भांडणे होऊ लागली. प्रशांतने घटस्फोटाची मागणी केली असता सासरकडच्यांनी त्यांना तब्बल ३० लाख रुपयांची मागणी केली.
त्यानंतर वारंवार पैशासाठी त्यांचा सासरकडून छळ होऊ लागला. त्यामुळे त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. विष प्राशन करताना त्यांनी व्हिडिओ बनवत पत्नी, सासू आणि सासरे यांना मृत्यूला जबाबदार धरले आहे. पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोखंडे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.